November 21, 2025

उदयपूर-ट्रीप शेवट

 सकाळी ७:५० ला डोळे उघडले. उदयपूरमध्ये हलकीशी थंडी पसरली होती—जशी राजकुमाराच्या पॅलेसमध्ये सकाळ असावी तशी! आजचा ट्रीपचा शेवटचा दिवस… आणि मनात विचार, “ट्रीपची सुरुवात धूमधडाक्यात होते आणि शेवट कधी होतो कळतच नाही!”

आम्ही आवरून नाश्त्यासाठी खाली आलो. आज ठरवलं होतं—नाश्ता हॉटेलमध्येच फुल्ल करायचा!
सकाळी ८:३० ला शेफ अगदी वाट बघत हजर! असे हसत होता जणू आम्ही नाही तर स्टार-Plusचे कलाकार ब्रंचला आलेत.

आम्ही टेबलावर बसलो आणि त्याने प्रेमाने पदार्थ आणायला सुरुवात केली.
“ऑर कुछ…?”
असं विचारत त्याने जवळजवळ सगळा नाश्ता थोडाथोडा वाढला.

मी विचार केला —
“हा शेफ घरीही एवढा प्रेमाने वाढत असेल तर त्याच्या बायकोला स्वयंपाक करायची गरजच नसावी!”
कधी कधी नुसता विचार करायला काय जातंय? 😄

नाश्ता करून शेफचे आभार मानून रूममध्ये आलो.
आता कसरत होती — बॅग भरायची!
ट्रीपला जाताना बॅग भरायला १० मिनिटं;
ट्रीप झाल्यावर अस्ताव्यस्त बॅग आवरायला ४० मिनिटं—वेदना अमर!
शेवटी ते भारी काम पूर्ण करून आम्ही खाली आलो.

रिसेप्शनमध्ये सदैव तत्पर Kishanji उभेच —
“सब सामान लिया क्या?”
त्यांच्या आवाजातली झिंग इतकी नैसर्गिक आहे की कधी कधी वाटतं,
हा रोज किती पान खातो रे देवा?

११:२३ ला आम्ही हॉटेलमधून शेवटचा निरोप देत बाहेर पडलो.
मनात एकच विचार —
“उदयपूर, तू तर भारीच आहेस… राजा, दिलदार आणि थोडं फिल्मीही!”

गाडी निघाली आणि Kishanji कथा सांगायला सुरू.
इतिहास, राजे, राण्या, युद्ध, तलाव, धरणं —
त्यांच्या कथा ऐकत ऐकत दुपारचे २:३० झाले.
राजस्थान बॉर्डरवर आम्ही जेवायला थांबलो — स्पेशल दाल-बाटी!

अरे बापरे… इतक्या प्रेमाने खायला दिलं कि जिभेवरून सरळ हृदयात गेलं.
शेवटी ताक टाकून जेवण संपवलं आणि गाडीत बसताच…
सगळ्यांच्या डोळ्यांना झोपेने हाय-हॅलो केलं.

४:०० ला आम्ही पुन्हा अहमदाबादला पोहोचलो.
तीन दिवसांच्या झंझावाती उत्साहानंतर आता शेवटचा मुक्काम.
हॉटेलवर उतरलो.
तिथे Kishanji प्रेमाने म्हणाले—

“सफर कैसा रहा जी? कोई शिकायत?”

शिकायत?
काहीच नाही!
फक्त एक विचार सतावत होता —
“भाऊ, बोलताना किती पान खातोस?!”
पण असो…
त्याने खूप प्रेमाने, काळजीने आणि संयमाने आमची ट्रिप छान केली.
त्याचा निरोप घेतला आणि तो परत जयपूरच्या दिशेने निघून गेला.

आम्ही फ्रेश होऊन थेट साबरमती रिव्हरफ्रंटला गेलो.
संध्याकाळी ७:३० ला आम्ही तिथे पोहोचलो आणि…
एकदम चाट पडलो!
स्वच्छ, सुंदर, मोकळा.
लोक सायकलिंग, जॉगिंग करत होते.
आम्ही देखील सायकलवर फिरलो — एकदम फिल्मी मूड!

नंतर अस्सल गुजराती जेवणाचा मस्त आनंद घेतला आणि ११:३० ला हॉटेलवर आलो. 

रात्री आम्ही हॉटेलवर आलो आणि डोळे थकल्यासारखे असले तरी मन मात्र अगदी ताजेतवाने होते. उदयपूरने काहीतरी वेगळंच दिलं होतं—फक्त स्थळांचा आनंद नाही… तर एक सुंदर आठवणींचा खजिना. तिथे प्रत्येक ठिकाणी एक वेगळं pride जाणवत होतं—इतिहासाचा, संस्कृतीचा, लोकांचा… आणि कसं कुणाला कळणार नाही इतकं आपल्या मनात मुरलेलं सौंदर्य!

पहाटेची ४:४० ची फ्लाइट पकडली. आकाशात भगवा रंग पसरत होता… आणि मला अचानकच जाणवलं—
“काही ट्रिप्स संपत नाहीत… त्या मनात घर करून राहतात.”

उदयपूर तसं होतं.
Royal. Peaceful. Magical.
आणि सर्वात महत्वाचं—आपल्याला भरभरून आनंद देणारं.

पुण्यात उतरलो, वंदे-भारत पकडली, पण डोक्यात अजूनही उदयपूरचीच चित्रं—
तो पिचोला लेक…
ते राजेशाही बंगले…
सिटी पॅलेसचे वळणावळणाचे कॉरिडॉर्स…
राजस्थानी डान्सचा तो रंग…
हॉटेल्सची अफलातून आर्किटेक्चर…
आणि ते शांत, थंडगार, सुखद हवेतलं प्रेम…

मनात एक प्रचंड हॅप्पी प्राइड उमलला होता—
“आपण हे अनुभवू शकलो… आपण हे जगू शकलो… ही ट्रिप आपली होती.”

आणि त्याचबरोबर एक भावना अधिक जोरात—
“उदयपूर, आम्ही परत येणारच…
कारण तुझ्या सौंदर्यामध्ये अजून आमचे अनेक अध्याय बाकी आहेत.”

ही ट्रिप म्हणजे फक्त फिरणं नव्हतं—
ही फॅमिली, फन, फूड, फोटो… आणि फीलिंग्सची एक जादुई सफर होती.

आनंद, समाधान, आणि परत जाण्याची उर्मी…
तीनही भावना हृदयात एकत्र खेळत होत्या.

उदयपूर…
तुझ्याकडे पुन्हा येणारच.
पुन्हा तोच राजेशाही रुबाब घेण्यासाठी,
पुन्हा तेच घुमणारे हास्य ऐकण्यासाठी,
आणि पुन्हा एकदा…
"आपण इथे आलोय" हा अभिमान अनुभवण्यासाठी.

कारण—
ही ट्रिप संपली नाही…
हिची आठवण सुरू झाली आहे.



No comments:

Post a Comment